Monday, 28 January 2013

हाक .......


आक्रोशली एक हाक  ,थिजले  तिचे सर्व प्रयत्न '
"मला जगायचं आहे खूप ... " असं म्हणून गेली ती

 














सर्व शब्द नि :शब्द  झाले आज ,
भावना ओसरल्या जागीच ,
तिच्या आठवणींचा एक कवडसा ,
 तिच्या शोर्याची एक तिरीप ,
आपण बाळगूया मनी ,

 देत निरोपाचा हात तिला ,
लढण्याचे वचन देउनी ,
स्फुल्लिंग पेटवू या जीवनी ,


आक्रोशाली एक हाक .........................





Saturday, 19 January 2013

संकल्प हरित पर्यावरणाचा




                       "पर्यावरण संवर्धन " ,  "जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) "  हे अलीकडे खूप परवलीचे शब्द झाले आहेत.  रोज वर्तमान  पत्र , टीव्ही  आदी  वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण पर्यावरण संवर्धन , ग्लोबल वार्मिंग याबद्दल बरच काही ऐकतो, पाहतो . काही लोकांसाठी हे शब्द फक्त शब्दच ठरतात , तर काहींसाठी हेच जीवनाच ध्येय ठरत .पर्यावरण संवर्धना बाबतीत आपल्या समाजात  विरोधाभास आढळतो . या समाजात  पर्यावरणास हानीकारक ठरणारी चंगळवादी वृत्ती आढळते तर याच समाजाचा भाग असलेले  गजेंद्र सिंग यांच्या सारखे व्यक्तिमत्व आपल्या "तरुण भारत संघा " च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ( सारिस्का ,  अरवली बचाओ आंदोलन , जोहड च्या माध्यमातून जलसंवर्धन  ईत्यादी ) यासाठी झटत असतात. आणि मग समाजातील  एक मोठा गट यांना असामान्य म्हणत सर्वासामान्यांपासून वेगळ करवून टाकतो. अस केल्यामुळे सर्वसामान्यांची जबाबदारी संपते ना ! कारण या "  विशेष लोकांसारख" सामान्य वागू शकत नाही , संपली सामान्यांची जबाबदारी , ना ? खर पाहता बहुतांश लोकांना काहीतरी करायचं मात्र असत ,
पण नेमकी सुरुवात कशी करायची? किंवा मी एकट्यान केल तर काय फरक पडेल ? अशा प्रश्नातच बरीच घुटमळत राहतात . तस  म्हणायला गेल तर पर्यावरण संवर्धन या बाबतीत" काहीतरी " करायची नवीन वर्षाच्या संकल्पाच्या  निमित्ताने संधी चालूनच  आली आहे , आणि तस पाहिलं तर सुरुवात हि पहिल्या पावलानेच होत असते .  तर चला  हरित संकल्पाकडे पहिल पाऊल  टाकूयात ........
                      पर्यावरनाचा ह्रास हा  चंगळवादी प्रवृतीचा परिणाम आहे. वाढत प्रदूषण , तापमान वाढ , जंगलतोड ,  हवामान बदल या एकमेकांशी निगडित समस्या आहेत. आणि या समस्यांच्या  समाधानच केंद्रबिंदू म्हणजे आपण "सामान्य" माणस. आपली जगण्याची प्रक्रिया, विकासाची प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांतीची प्रक्रिया जर आपण निसर्गपूरक केली तर यातील बहुतांश समस्या राहणारच नाहीत.
उदाहरणार्थ उर्जा वापर , आपण सर्वांनी उर्जेचा वापर काटेकोरपने (efficiently) केला तर किती तरी समस्या सुटू शकतील. या उर्जे मध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होईल . वीज , पेट्रोल , पाणि , इतर इंधन वगैरे गोष्टी उर्जेचा स्त्रोत म्हणून आपण वापरतो . या उर्जेचा काटेकोर आणि डोळस पाने वापर केल्यानंतर किती तरी समस्या सुटू शकतील. गोष्ट तशी खूप साधी आहे. आपल्या घरी , ऑफीस मध्ये विजेचा,पाण्याचा  डोळस ,कार्यक्षम ,प्रभावी वापर म्हणजेच काय तर यांचा अपव्यय टाळणे. उदाहरणार्थ -- १.  गरज नसताना पंखे बंद करणे  २. टिव्ही पहायचा नसेल तर टीव्हीचा मुख्य स्विच बंद करणे. ३. गरज नसताना दिवे बंद करणे. ४. चांगल्या "वीज बचत क्षमता " असलेल्या उपकरनांचा वापर इत्यादी . तास पाहता या गोष्टी खूप सोप्या आणि सध्या आहेत पण याचा परिणाम खूप दूरगामी आणि मोठा होईल.
                    विजेच्या डोळस वापराचा हा हरित संकल्प पर्यावरण संवर्धनास खूप चालना  देऊ शकतो. कारण उर्जा बचत (वीज बचत) हे एक प्रकारे वीज निर्माण केल्यासारखच आहे.याचे तिहेरी फायदे आहेत . पहिला फायदा वीज बिल बचत दुसरा वीज बचतीमुळे वीज पुरवठा व्यवस्थापन चांगल होईल आणि तिसरा फायदा होईल अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर कमी तान .कारण वीज निर्मिती मध्ये एक तर प्रचंड साधनसंपत्ती लागते (कोळसा , डीझेल , LPG/LNG  ) आणि या इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रचंड प्रदूषण आणि हि इंधने काढण्यासाठी लागणारी प्रचंड उर्जा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण .म्हणजे हि सगळी प्रदूषणाची साखळी आहे.आपला कार्यक्षम वीज वापर प्रदूषण भार  कमी करू शकते.  आता हे पटण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. समजा एका शहरात दोन नगर (colonies ) आहेत . कॉलोनी x आणि कॉलोनी y . या मध्ये प्रत्येकि  चार घर आहेत ( a,b,c आणि d ),  कॉलोनी x  मधील  a,b,c,d या घरांनी प्रत्येकी  X1 , X2 , X3 , X4 एवढे युनिट वीज बचत केली .त्याच प्रमाणे कॉलनी y मधील घरांनी Y1, Y2 , Y3  आणि Y 4  युनीट  एवढी बचत केली . म्हणजे शहराची संपूर्ण बचत म्हणजे या सगळ्या बचतीची बेरीज . समजा शहराची एकूण बचत Cs युनीट आहे . आता समजा जर Cs युनिट उर्जा निर्माण करायला किती साधन संपत्ती लागली असती आणि त्यामुळे किती प्रदूषण जाहले असते. समजा या Cs  युनिट उर्जा तयार करण्यासाठीचा कार्बन फूटप्रिंट किंवा कार्बन इक्वीव्ह्यालंट  हे विचारात घेतल्यावर आणखी एक फायदा मिळू शकतो. कार्बन  फूटप्रिंट म्हणजे एखाद्या प्रक्रियेमुळे , लोकसंख्येमुळे होणारे हरित -गृह वायू उत्सर्जन याची मोजणी . या वीज बचती च्या संकल्पात शासन , किंवा शासनाची संस्था , विद्युत मंडळे , विदयुत निर्मिती कंपन्या यांची साथ मिळाल्यास
या कार्बन इक्वीव्ह्यालंट चे  कार्बन क्रेडिट्स मिळवून आणखी निधी / पैसा मिळवता येऊ शकतो . जर हि वीजबचत मोहीम एका घरातून , कॉलोनी , शहर , विभाग , राज्य , देश अशी वाढत गेली तर किती वीजबचत होऊ शकेल आणि किती प्रचंड प्रमाणात पर्यावरणावरचा ताण कमी होऊ शकेल. फक्त गरज आहे छोट्या छोट्या  कृतीची , खूप साध्या साध्या  गोष्टी/ सवयी मुले आपण वीज बचत करू शकतो . आणि फक्त वीज च नाही तर आपण पाणी , इंधन या बाबतीत सुद्धा कार्यक्षम वापर करून खूप काही साध्य करू शकतो. गरज आहे हा उर्जेचा कार्यक्षम वापर हा हरित संकल्प पूर्ण अमलात आणायची .
                               या सध्या हरित संकल्पाबरोबरच  , आपण अजून एक छोटासा हरित संकल्प करू शकतो तो म्हणजे आपल्या घरातील कचरा व्यवस्थापनाचा . आपण सर्व ,शहरातील कचरा समस्येवर चिंतीत होतो , नगर परिषद , नगर पालिका यांना  शिव्यांची लाखोली वाहून मोकळे पण होतो पण या समस्येच समाधान छोट्याशा कृतीतूनच होईल आणखी एक छोटस पाउल , आपल्या घरच्याच कचरा व्यवस्थापनाच .  साधी गोष्ट आहे , आपल्या घरातच कचरा वेगळा करायचा प्लास्टीक (non bio-degradibles)  आणि नैसर्गिक रित्या विघटन होणारे असा कचरा वेगळा करायचा. जर सर्वच लोकांनी / घरांनी , कार्यालयांनी, शाळांनी , वस्त्यांनी असा कचरा वेगळा साठवायला सुरुवात केली , तर कचरा व्यवस्थापन खूप सोप तर होईलच आणि केवळ  प्लास्टीक कचरा प्रक्रिया करणे स्थानिक स्वराज्य संस्थाना सोप होईल . कचरा वेगळ करन त्यांना सोप जाईल मग incinerator मार्फत स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रक्रिया करू शकतील.
तसेच नैसर्गिकरित्या विघटन होणाऱ्या कचऱ्या पासून खात निर्मिती आदी प्रकल्प चालवता येतील . ग्रामीण भागात बचतगटांच्या सहकार्याने हे प्रकल्प चालवता येतील. हे प्रकल्प अगदी वार्डस्तरावर सुद्धा राबवता येऊ शकतील. कचऱ्या पासून वीज निर्मिती चे प्रकल्प सुद्धा होऊ शकतात ( उदा -- पिंपरी-चिंचवड येथील प्रकल्प ).
स्वत: च्या घरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित संभाळल तर शहराच  कचरा व्यवस्थापन संभाळता येईल . त्यामुळे शहर तर सुंदर होतीलच पण खात प्रकल्प , वीज प्रकल्प आदी फायदा पण मिळवता येईल .
                          वीज बचत आणि कचरा व्यवस्थापन (स्वत : च्या घरचे ) ,   हे हरित संकल्प खूप साधे आणि सोपे  आणि विशेष म्हणजे करण्यासारखे आहेत . आपल्या कधी वाचनात आलच असेल वृक्षो रक्षति रक्षत : त्याच धर्तीवर पर्यावरण रक्षति रक्षत : अस सुद्धा म्हणता येईल आणि ते खर्च आहे. तर मग तयार आहोत ना आपण सर्व जन हे छोटेसे संकल्प अमलात  आणण्यास , नाहीतर "पण  लक्षात कोण  घेतो ? " हे नेहमीचच झाल आहे .......
                           



 

Friday, 18 January 2013

विरह



    तुझा विरह  कधी धगधगता वैशाख , तर कधी वसंत खास ,
    तुझ्या विरहात कधी फुले पाकळी , तर कधी होते हातांची ओंजळ ओली ,

    तुझी साथ  देऊन गेली जन्मभराची शिदोरी ,तर आता त्याची आठवण देते जगण्याची उभारी ,
   तुझ्याविना जीवन जस काटेरी पायवाट , तुझ्या आठवणीत रमून जान जस " पक्ष्यांचा" किलबीलाट ,
    तुझ  हसन सख्या /सखे जस गुलाबाच कोमल फुल ,तुझा गोजिरा चेहरा जस लूटलुटत  गोंडस मुल .........


 

भावना



भावना  दाटून येता  , शब्द का रुसतात कोण जाने ,
या शब्दांना भावनांची कदरच नसते जणू ,
 पण , भावना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरजच नसते ना ,
त्या पोहोचल्या असतात या " स्पंदनापासून " त्या  "स्पंदनापर्यंत ",
अगदी "शब्दांविना " ....................


त्या पोहोचतात  अव्यक्तातूनी व्यक्त होऊनी,
ओथंबून  टाकतात भावविश्व सारे,
पुलकित करतात रोम रोम सारे ,
कधी हसवतात तर कधी अश्रूंचा लपंडाव खेळतात ,
अगदी  "शब्दांविना"....................













Saturday, 7 July 2012

"आठवण"

                                                             "आठवण"

स्मृती विस्मृतीत जात नाहीत ,
ते निरागस क्षण नजरेआड होत नाहीत ,
त्या क्षणांतून प्रेरणा घ्यायची असते मला ,
मात्र भावनांची झालर दूर होत नाही .......

आठवणी त्रास देतात .....
आठवणी त्रास देतात .....

Sunday, 6 May 2012

सत्यमेव जयते , स्त्री-भ्रूण हत्या आणि आपण

                                            सत्यमेव जयते , स्त्री-भ्रूण  हत्या आणि आपण 



           आरसा रोजच्या वापरातील  महत्वाची वस्तू . आपल  प्रतिबिंब दाखवणारी वस्तू .आपल " सत्य" रुप दाखवणारी वस्तु . आपल्या बाह्य व्यक्तिमत्वास "कुठे सुधरायचं " आहे ते दाखवणारी वस्तू ......
आमिर खानचा " सत्यमेव जयते " हा समाजाचा आरसाच वाटला. समाजाचं " सत्य" "दाखवणारा "सत्यमेव जयते" नावाचा आरसा." स्त्री-भ्रूण  हत्या"  या दाहक  वास्तव्यास समोर आणणारा आरसा.
              विषय  तसा  जुनाच " स्त्री-भ्रूण  हत्या". जेवढा  जुना तेवढाच दाहक .
               आई,बायको म्हणून आवडणारी स्त्री मुलगी म्हणून  का नको हा खूप विचार करायला लावणाराप्रश्न आहे. ग्रामीण  आणि अशिक्षित (अडाणी) लोकांपेक्षा शहरी आणि तथा-कथीत "एजुकेटेड " वर्गात  स्त्री-भ्रूणहत्येच प्रमाण  जास्त आहे , हे वास्तव डोळयात  अंजन  घालणारे आहे. देवापेक्षाही ज्याला समाज  मोठा समजतो त्या "डॉक्टर" लोकाचा यातील  सहभाग  मनाला चटका लावणारा आहे आणि त्याहीपेक्षा मोठा विरोधाभास  असा की बहुतांश  वेळेस एक सासू (एक स्त्री ) आपल्याच  सुनेला ( ती पण एक  स्त्री )  भ्रूण हत्या करण्यास भाग पाडते .
              भ्रूण  हत्या आणि त्याचे दुष्परिणाम ,भ्रूण  हत्या  रोखण्यासाठीचे उपाय , कायदे या तांत्रिक  गोष्टीत मला शिरायचे नाही . दुष्परिणाम , आकडेवारी हे आहेच . पण  खरा प्रश्न आहे तो वृत्ती सुधारण्याचा.आपल्या सर्वांच्या खूप खोल आत  राहिलेली वृत्ती(पुरुषांच्या आणि आश्चर्य-कारकऱीत्या स्त्रियांच्या  सुद्धा).वृत्ती स्त्री ला नेहमी एक  पायरी खालचा दर्जा देण्याची,त्यांना दुय्यम स्थान देण्याची.वेळ आली आहे या वृत्ती ला बदलण्याची,या विचारला छेद देण्याची.कारण कायदे,नियम हे वरवरचे उपाय असतात.
खरा उपाय  हा विचारांचाच आहे.तुमच्या आणि माझ्या विचारांचा. आणि हा साधासोपा उपाय म्हणजे "समानतेचा" विचार .
               "पण  लक्षात  कोण   घेतो ?" हे आता नेहमीचच  झाल  आहे..............

.
                बाकी " सत्यमेव जयते " ला खूप खूप शुभेच्छा आणि  समाजाचा आरसा झाल्याबद्दल  धन्यवाद .




(टीप  : आजकाल  आपणास  हवा तसा आरसा करून घेता येतो , म्हणजे जाड  लोकंना बारीक  दिसणारा आरसा मिळतो . ठेंगू लोकंना उंच  दाखवणारा आरसा पण  असतो . समाजास  असा आरसा मिळू नये हीच  प्रार्थना ...)




जाता जाता ,कमनशिबी आई -बाबांस  



कदाचित  ती हि उमलली असती ,
अंगण  सुगंधित  करत  ,

                   कदाचित  ती हि बागडली असती 
                    आसमंत  दणाणून  सोडत 

कदाचित  तिनेही दिली असती 
साद " अंतरातून  " आई - बाबा" म्हणून 

                    कदाचित  ती हि बिलगली असती खास ,
                     लटक्या रागातून ,

 कदाचित  तिनेही वाटला असता "आनंद - प्रसाद "
 आपल्या इवल्या इवल्या हातातून 

                       कदाचित  तिनेही धरला असता हात  , 
                        थरथरत्या प्रसंगातून 

कदाचित  .............




Wednesday, 2 May 2012

गाढव आणि मी







 माकड ,बैल , घुबड ,नर्मदेचा गोटा ई. ज्यांच्यावर मराठी भाषेने अगदी सुरुवातीपासून घोर अन्याय केला आहे त्यांच्या यादीत सर्वात पहिलं येणार नाव म्हणजे "गाढव". गाढवावरचा हा सांस्कृतिक तसेच भाषिक पातळीवरचा होणारा अन्याय आणि अपमान पाहून आमच्या मनाला ज्या यातना होत आहेत त्या फक्त एक गाढवच समजू शकेल(तोही अस्सल उकीरड्यावरचा असेल तरच !)
            तस पाहिलं तर गाढव आणि आमच्यातल साधर्म्य जगाने आमच्या जन्मापासूनच किंबहुना त्या आधीच ओळखल असावं (महाभारतातल्या आभिमन्युसारख्या आमच्याही चेतना गर्भावस्तेत जागृत होत्या. फरक इतकाच कि तो हुंकार द्यायचा आणि आम्ही लाथा मारायचो.पण त्याच मात्र किती कौतुक आणि आम्हाला मात्र "गाढव मेला " म्हणून शिव्याशाप). अशीच एक लाथ आम्ही जन्मल्या जन्मल्या आमच्या आजीला मारली अस ऐकून आहोत.
           असो प्रश्न इथे आमचा नाही तर गाढवावरील अन्यायाचा आहे. गाढव म्हणजे गावातला "ढ" ही संकल्पना पूर्वापार रूढ झाली आहे.गाढव म्हंटला कि लगेच कामचुकार,आळशी,मूर्ख,निर्बुद्ध,आयतखाऊ ई .ई. विशेषणांची जंत्री समोर येते.दूर कशाला जाता आमचंच बघा ना, शाळेत असतानाही मास्तर ( काही लोकांसाठी गुरुजी/शिक्षक  असतील तर मास्तर वापरल्यामुळे क्षमस्व)....... हां तर; मास्तर  मला रोज " गाढवातला गाढव  ही तुझ्यासारखा गाढवपणा करणार नाही " असं सारख म्हणत . तेंव्हा त्यांना संदर्भासहित स्पष्टीकरण द्या असं म्हणण्याची आमची काय बिशाद ... शब्द चुकला बघा बिशाद च्या ऐवजी " टाच "असं वाचाव वाचकांनी .       (गाढवांवरील असीम सहानुभूतीमुळे आम्हाला टाच ,पाय, लाथा या शब्दांच विशेष आकर्षण आहे). तर मग त्यावेळेस आमच्या बाल-समजुतीप्रमाणे आम्ही गाढवातही काही शहाणी गाढवं असतात  असा समज करून 
घेतला.अर्थात इथे शहाण्या गाढवांचा विषय नाही आम्हास चिंता आहे ती इतर सर्व गाढव बंधूंची (भगिनींचा समावेश पण यात आहे अस गृहीत धराव,स्त्री-पुरुष समानता हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण त्याबद्दल नंतर कधी .....) असो पुढे बाल्यावस्थेतून थोड फार " वयाने वाढलो" आम्ही , हो जाणूनबुजून वाढलो असा शब्दप्रयोग केला आहे  कारण कोणी आम्हाला मोठ झाला अस कधी म्हटलंच नाही.हाही आमच्यावरचा गाढव-सदृश अन्याय.असो मागची पुढची गोष्ट मनाला न लाऊन घेता आपापला चिखल तुडवत राहायचं ही शिकवण आम्ही गाढवाकडून शिकलोय.
          तर मग जसे जसे आम्ही वाढत गेलो तसा आमचा गाढवपणा ही वाढत गेला , मग "जातीवंत गाढव",    "गाढव मेला" अशी विशेषणं अंगवळणी पडली ती पडलीच.यातून आमचा आणि गाढवांचा ऋणानुबंध उत्तरोत्तर घट्ट होत गेला. गाढवांचे गुणधर्म कळत गेले. नेहमी आपण म्हणतो , " गाढवाला गुळाची चव काय? " -- आता 
बघा, मुळात गाढवाला कोणी गूळ खाऊ घालताना किंवा गाढव गूळ खाताना मी तर पाहिलं नाही.आणि समजा जरी आपण मान्य केलं कि चला गाढवाला गुळाची खरच चव नाही तर यातून गाढवाच अनासक्त योगी पण सिद्ध होत. त्याच्यासाठी  पंचपक्वान ( इथे गाढवासाठी पंचपक्वान म्हणजे गूळ ) सुद्धा चवहीन(testless हो) त्याच्यासाठी उकीरड्यावरचा कागद ,कचरा आणि गूळ हे सगळे एकच.जगातल्या सर्व सुखसोयींचा त्याग करून वल्कल नेसणारा , जीभेवर पूर्ण नियंत्रण मिळवणारा ,स्वच्छता टापटीपपणा या भौतिक गोष्टीत न अडकता ध्यानस्थ होणारा तो योगी आणि तसाच वागणारा हा प्राणी म्हणे गाढव.घोर अन्याय आहे हा!!
 " गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता" अशीच काहीबाही म्हण आहे .आता इथे आपण थोडस मानून चालू की गाढव ते गाढव अरे मग तुम्ही शहाणे आहात ना मग गाढवापुढे गीता वाचलीतच का?......आणि तुम्ही काय स्वतःला ज्ञानेश्वरांचे अवतार समजता की काय ? आता गोंधळाचे म्हणाल तर त्यातून गाढवाचा रसीकपणाच दिसून येतो( इथे दाद फक्त त्याने त्याच्या भाषेतून दिली; भाषास्वात्यंत्र आहे आपल्या देशात अजून)
                     गाढवाचा गाढवपणा लहानपणा पासूनच मनावर बिंबवण्यासाठी सांगण्यात येणारी एक गोष्ट सर्वार्थाने कशी चुकीची आणि पूर्वग्रहदुषित आहे हे इथे सांगणे संयुक्तिक ठरेल.अहो तीच ती गोष्ट हो --- एक गाढव रोज पाठीवर मीठ वाहून नेत असे , रस्त्यात एक नदी लागे , गाढव मग नदीत उतरे,मीठ पाण्यात वाहून गेल्यामुळे पाठीवरच ओझ कमी होई वगैरे वगैरे . आता तुम्हीच पहा मीठ लाद्न्यागोदर मालकाने गाढवाला विचारलं होत का? गाढवाच्या मर्जीविरुद्ध जर मीठ लादल गेल असेल तर हा अन्याय नाही का? (इथे गाढवाचेच आभार मानायला हवेत; अहो का ? अस कस विचारता मेनका गांधीना विसरलात वाटत ). आता दुसरा मुद्दा असा की ,मालकाने गाढवाजवळं waterbag दिली होती का पाणी प्यायला?  तहान लागल्यावर नदी ,डबके
इकडेच जाणार तो , आता नदीवर गेल्यावर थोडा आंघोळीचा वगैरे मूड झाला तर तो पाण्यात उतरणारच ना? हे तुमच बर आहे आंघोळ केली तर त्याला तुम्ही कामचुकार म्हणणार आणि नाही केली तर घाणेरडा. अजून तर काहीच नाही अन्यायाची परिसीमा पुढेच आहे , नंतर म्हणे मालकाने गाढवाला अद्दल घडवायला त्याच्या पाठीवर कापूस लादला, नदीत उतरल्यावर कापूस भिजून जड झाला आणि गाढवाच्या पाठीवरच ओझ वाढल.
आणि गाढवाच कंबरड मोडल. धिक्कार, धिक्कार इथे गाढवाच चुकल अस आम्हाला वाटत नाही ,देवान त्याच्या शरीराची रचनाच अशी केली आहे की त्याला पाठीवर काय आहे हे पाहता येत नाही त्याला काय माहिती की पाठीवर मीठ आहे की कापूस.इथे गाढवाचा प्रामाणिकपणा पहा त्यानं पाठीवरचा खूराक खाल्ला नाही (अहो कापूस हो) . शेवटी गुळाची जाऊ द्या हो मात्र गाढवाला " मालकाच्या खाल्लेल्या मिठाची" चव आहे हेच सीद्ध होत इथे.
             तर नेहमी खाली मान घालून चालणारा , कधीही तक्रार न करणारा , न लाजता उकीरडे फुंकणारा , चालता चालता चुकून एखाद्याला किंवा एखादीला (स्त्री पुरुष समानता विसरलात वाटत) लाथ मारणारा (मुद्दामहून पायात पाय घालून पाडण्यापेक्षा हे हजार पटीने बर आहे ) गाढव आम्हाला नेहमीच आमच्या अंतरंगाच प्रतिबिंब वाटत आलाय .

                   त्यामुळ हे मानवांनो जागे व्हा आणि आपलं माणूसपण सांभाळा; नाहीतर मी सर्व जातिवंत गाढवांचा प्रणेता जाहीर करतो की गाढव आपल्या "गाढवपणा" सह या धरतीचा भार उचलण्यास सज्ज आहेत .

                                                                       -----  आपला गधर्भराज .


**  टीप
          देवान "गधर्भरास " नावाचा नवा ब्रांड चालू केला आणि त्याच पाहिलं आणि शेवटचं product म्हणून आम्हाला या मृत्युलोकात पाठवलं.